दृश्याला दृश्याची आवश्यकता आहे. पण, प्रथम निष्काम गती पाहिजे. मी जरी काम करतो, काम करण्यासाठी मजूर लावतो, घरे बांधतो, दगड लावतो तरी हे माझे काही नाही. सर्वस्व भगवंताचे आहे. मी निमित्त मात्र आहे. इतकी जरी धारणा झाली, तरी गती निष्काम होते. मग सर्वस्व आपोआप जाग्यावर येते. पण निष्काम धारणा ठेवली पाहिजे.
याच्या उलट स्थिती झाली तर मन बेचैन होते. पण दृश्यातच राहून, दृश्याशी खेळ खेळत स्थिर व्हावयाचे आहे. सर्व ऋषीमुनी होऊन गेले. त्यांची धारणा निष्काम होती. ते म्हणत, “कर्ते, करविते निराळे आहेत. आम्ही निमित्त मात्र आहोत. सर्वस्व त्यांच्याच कृपेने होते.”
रामदास, ज्ञानदेव यांचे उदाहरण घ्या. ते कसे निष्काम होते. त्यांची भावना निष्काम होती. पार्थाला सुद्धा भगवंताने सांगितले, “तू फक्त निमित्तासी कारण आहेस. तुझा हा सर्वस्व भ्रम आहे. तुला फक्त निमित्ताला उभे केले आहे. मारविता मीच जाण. ते कसे ते बघ.”
लाघवी रूप धारण केले. दृश्य रूप प्रगट केले. पण, त्याला पाहता येईना. त्यांनी त्याला धीर दिला. दिव्य दृष्टी दिली. तरी सुद्धा पाहता येईना. त्याला त्यांनी सांगितले, ”घाबरू नकोस.” याप्रमाणे त्याला आढावा मिळाला. जाणीव करून दिली. “पार्था, तू निमित्त मात्र आहेस.” हा पार्थाला त्यांनी चमत्कार करून दाखविला. तसाच हल्लीच्या मानवाला चमत्कार लागतो. एवढे करून सुद्धा पार्थाला सांगितले, “तू जर केले नाहीस, तर तुझ्याकडूनच करून घेणार आहे.” ©️