श्री समर्थ मालिक –
संतांच्या म्हणीप्रमाणे भक्ती कशी आहे?
तुका झाला सांडा ! विटंबती पोरे रांडा !! मग भक्तिसाठी कसे झाले पाहिजे? भक्त हा समर्थांसाठी, भक्तिसाठी, सांडा होतो. भक्त सांडा झाल्यानंतर, भगवंत सुद्धा त्याप्रमाणे होतात. भक्तिची विटंबना झाली तर ती भगवंताची विटंबना होते. भक्त सांडा झाल्यानंतर कोणी काही म्हणो, त्याची चाड भक्ताला पण नसते आणि भगवंताला पण नसते. मग विटंबना करणाऱ्या मानवाचा नाश करण्यात येतो का? तर नाही. त्याच्या कृतीचे फळ भरल्यानंतर, त्याचा घडा आपोआप लवंडला जातो. तो आपोआप पंथाला लागतो.
पण अशा भक्ताने कधी म्हटले आहे का, मला माणूस त्रास देतात. समर्था का डोळे झाकलेत? असे तो कधीही म्हणत नाही. त्याने ओळखलेले असते, कोण कोणाची निंदा करतो.
सर्व ठिकाणी, सर्वांच्या अंत:र्यामी भगवंत आहेत. असा तो नि:संग होतो. मग भगवंत सुद्धा नि:संग होतात. अशा भक्ताला भगवंत दूर लोटत नाहीत. त्या भक्ताचा सांभाळ भगवंत जीवा पलीकडे करतात. अशा भक्ताला कोणीही काही करू शकत नाही. त्याची जरी विटंबना झाली तरी त्याचे त्याला काहीच वाटत नाही. तो आपल्या नामात, ध्यानात गुंग असतो. त्याचे लक्ष तिकडे नसते. तो समर्थांच्या ठिकाणी रममाण झालेला असतो. त्याला समर्थां शिवाय काही दिसत नाही. म्हणून अशा भक्ताला, सेवेकऱ्याला कोठे ठेवले, ते फक्त मलाच माहीत असते. इतरांना त्याचा थांग पत्ता लागणार नाही. कोणी लावलेला नाही. हल्लीच्या मानवाला त्याचे काही नाही. मानव म्हणतो, कुठे काय आहे? पण जो डोळस आहे, तो असे म्हणत नाही. म्हणून संतांनी सांगितले, तुका म्हणे जग सारेची आंधळे !
एक आंधळा असला तर सगळेच आंधळे, म्हणजे एकाने नालस्ती केली म्हणजे दुसरेही करतात.
या दरबारचे सेवेकरी आंधळे आहेत का? तर नाही. सर्व डोळस आहेत. तेव्हा अशा तऱ्हेने वाटचाल करणे. सेवेकरी सर्वच डोळस आहेत. विश्वास ठेवा. विश्वासाचाच उपयोग होतो. त्याचा सेवेकऱ्याने अवश्य उपयोग करून घ्यावा. हे संदेश आहेत. कोणी विटंबना केली तरी सेवेकऱ्याने काय म्हणावयाचे असते, जरी निंदा केली, विटंबना केली तरी ही माझी विटंबना नाही. ही तुमचीच विटंबना आहे. तुमची विटंबना तुम्हीच करता. तेव्हा सेवेकर्याच्या ठिकाणी लिनता, नम्रता आणि शांती असावी. (समाप्त)