देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ! म्हणून रात्रभर एखाद्या देवळात भजन म्हणणे, टाळ कुटणे, जागरण करणे अशाने ईश्वर मिळत नाही.
सद्गुरु नामस्मरणात आणि दर्शनात शांत चित्ताने, त्याच तत्वात लय होवून, मी कोणीही नाही, करणारे, करविणारे, करायला लावणारे सद्गुरूच आहेत असे म्हटले, म्हणजे त्या दयाघन माऊलीला काळजी पडते. त्या व्यतिरिक्त चारही देहाचा उद्धार होणे शक्य नाही. ते ध्यान, ते चिंतन फारच वेगळे आहे.
काहीं मानवांना विचार पडतो, गुरू माऊली कोठे असेल? गुरू कसे आहेत? गुरू कोणाला म्हणावे? गुरू कसे ओळखावेत?
तर, अज्ञान अंध:कारातून पूर्ण प्रकाशात फेकतील तेच सद्गुरु ! तिच सद्गुरु माऊली !! तेच परब्रह्म तत्व !!! तेच सर्वस्वाचे निधान !!! त्यांच्या छबीचा अनुभव अनेक संतांनी अनुभवला आहे. तुकाराम, नामदेव अशा संतांनी त्यांचे वर्णन केले आहे. त्यांच्या भाष्यावर लक्ष दिले म्हणजे थोडीफार जाणीव येइल. जे संतांनी अवलंबिले ते तुम्हीं का आचरणात आणत नाही? की तुमच्या कडून तशी आचरणे होत नाहीत?
मनाचे तरंग, निरनिराळे विचार, मनाची चलबिचल, द्वैत भावना याने माऊली केव्हांही दर्शन देणार नाही आणि तोपर्यंत सर्वच मिथ्य आहे.
मी कोण आहे? याची जाणीव जो पर्यन्त होत नाही, तोपर्यंत सर्वच अर्थहीन आहे. जोपर्यंत तुम्हाला कोणी दाखविणारे, मार्गदर्शन करणारे मिळाले नाहीत, तोपर्यंत काहीच आकलन होणार नाही. तेव्हढ्याच साठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रयत्न करणे हे मानवाचे कर्तव्यच आहे.
सद्गुरु परब्रह्म हेच सर्वस्वाचे निधान आहे. तेच आपणास जाणीव देतात आणि सांगतात, बेटा ! तू कोण आहेस ते पहा ! याच्यावरच हे वाक्य आहे. याच्यावर मी आणखी काय सांगू? ©️