त्यावेळी स्थूलांगी मारलेले अघोरी राक्षस आता स्थूल मानवांना त्रास देत आहेत. त्याचा पूर्णत्वाने नाश करणे हे कर्तव्य आहे. आसनाधीस्त पूर्णत्वाने हे जाणीत आहेत, पण आपण मानवी तऱ्हेने नाराजी पत्करू नये. संदेशाप्रमाणे सर्वस्व कर्तव्य होत आहे. पूर्ण झाल्यानंतर, मग पहा.
उ:शापाचा काळ समीप आला आहे. मानवी शुद्धीकरण वाट पहात आहे. त्याला एकदा गती मिळाली की मग पहा काय होते ते? मानवी शुद्धीकरणाचे कार्य आसनालाच करावे लागेल. तेच मालिक, एकमेक एकमेकांवर अवलंबून आहेत.
कृष्णावताराच्या वेळी विचित्र तऱ्हा, विचित्र जबाबदारी असताना कधीही नाराजी पत्करली नाही. म्हणून कर्तव्याला नाराज होऊ नये. कर्तव्य करीत राहणे. मी प्रत्येक सेवेकऱ्याच्या पाठीमागे आहे. मानवी शुद्धीकरण करून घेणारा मी आहे. प्रत्यक्ष मी जर सेवेकऱ्यांच्या पाठीवर आहे, मग निसर्गाला त्याची जाणीव नाही का? या आसनाचे कर्तव्य फार उज्वल तऱ्हेने चाललेले आहे. या आसनाच्या सानिध्यात जे सेवेकरी आहेत, ते महा भाग्यवान आहेत. त्यांना मार्गदर्शन करा.
आज मी रामस्वरूपी उभा आहे. प्रत्यक्ष मारुती व माझे सद्गुरू श्री गुरुदेव वसिष्ठ या ठिकाणी आहेत. येथील काही ज्योतींना नामस्मरणाची गती सापडली नाही असे मला खेदाने म्हणावे लागते. नामस्मरणातच राम प्रगट होते. तोच मी राम सर्व व्यापक असूनही अलिप्त आहे. धन्य तुम्ही मानव की सानिध्यात अनुभव घेत आहात. मी राम असताना माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी नतमस्तक होतो. ते मला पूर्णत्वाने ओळखत होते. त्याचप्रमाणे तुम्ही सेवेकरी, वाटचाल करा. पुढची दिशा फार निराळी आहे. थोडा त्रास आहे, तो सहन करा. मी सांगितल्याप्रमाणे होणारच आहे. ते झाल्यानंतर शांती मिळेल. त्याप्रमाणे तुम्ही वाटचाल करा. हे संदेश आजच्या शुभ दिनी देत आहे. (समाप्त) ©️