तुकोबाने म्हटलेले सत्य आहे. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने विवंचना केली तर त्याप्रमाणे होईल की नाही? त्या संतांनी जे म्हटले ते सर्वांकरिता म्हटलेले आहे नाही का? त्यांना ते दिसत होते, पण इतर ज्योतीना त्याचा अनुभव नव्हता. त्यांचा भाव निराळा नव्हता.
तुकोबाला किती त्रास झाला? त्याने भोगले की नाही? मग असे का झाले? सेवेकऱ्यांनी विचार करावा. सर्वांची मते त्याप्रमाणे होती का? होय म्हणावे तर त्यांना त्रास किती झाला? मग यातील मेख कोणी जाणली होती? तुकोबांनी म्हणा किंवा इतर संतांनी म्हणा, ती जाणली होती. पण दरबारच्या सेवेकऱ्यांनी जाणली होती का? सेवेकरी तंद्रीत बसले तर त्यांना जाणता येईल की नाही?
समर्थ वाटेल ते करतील, पण सेवेकरी कर्तव्यात निमग्न असेल तर समर्थांना वाव मिळेल का? तुमच्या हाताने तुम्ही तुमचे नुकसान करून घेता. वाचाळता, भंकसपणा तुमच्या संगती येईल का? सेवेकऱ्यांनी जाणले म्हणावे तर असे का?
गुरुबंधुत्वाचे नाते किती नाजूक आहे. पाठचा भाऊ हात वर करून संपत्तीचा वाटा मागावयास येतो, पण गुरुबंधू वाटा मागवयास येईल का? त्याच्या ठिकाणी किती प्रेम असते, ते तो डावलिल का? मग आपण या ठिकाणी कसे राहिले पाहिजे? तेव्हा गुरुबंधूत्वाचे नाते कसे आहे हे सेवेकऱ्यांने ओळखून त्याप्रमाणे वाटचाल करणे. समत्वाने वागून आपल्या कर्तव्यात निमग्न राहणे. कृतीत उतरेल तेव्हा, तुकोबांच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात येईल. (समाप्त)