हे धन कधीही उच्च पातळीला भिडविणारे नाही. म्हणून धनलोभी होऊ नका. धन पाहिजे, पण फक्त व्यवहारासाठी. धनासाठी सेवेकरी लांड्यालबाड्या करतात, पण ते योग्य नव्हे.
धनाचा योग्य तऱ्हेने वापर केल्यास, समर्थ कमी पडू देणार नाहीत. समर्थ सांगतात, ते दूरवर विचार करून सांगतात. अशा तऱ्हेने जो वागेल, त्याला समर्थ काहीही कमी पडू देणार नाहीत.
जडाला, स्थुलाला किंमत आहे. नसती तर बुद्धीचे तेज प्रगट झाले असते कां? तेव्हा हीन गतीने जाता कामा नये, जाण्याचा प्रयत्न करू नये. तुम्हाला काही कमी पडणार नाही. पण त्या तऱ्हेने वागा.
सेवेकरी समर्थांना बनवायला लागला तर तो स्वत: बनला जातो. या अथांग महासागराची एक बिंदू बरोबरी करू शकतो कां? अशी स्थिती असताना, समर्थांना शेंडी लावायला जाल तर कसे होणार?
भक्तिमध्ये निर्लज्ज झाल्याशिवाय सद्गुरूंचा अंत सापडणार नाही. तेव्हा त्या ठिकाणी कसली लाज? बिंदू जर सागराची बरोबरी करू लागला, तर तो टिकाव धरील कां? असे अनंत बिंदू त्यांनी फेकले आहेत. त्या अनंत बिंदूतला आपण एक कण आहोत. तो कण त्यांच्या चरणांजवळ जावा ही इच्छा आहे. पण मनुष्याचे जीवनच विचित्र झाले आहे. म्हणून सेवेकऱ्याने लाघवी त-र्हेने धनलोभी होऊ नये. (समाप्त)©️