अलख – सेवेकऱ्यानीं कोणत्या तऱ्हेने भक्ती म्हणजे नामस्मरण करावे? सेवेकरी नामस्मरणात बसले असताना, जर ध्यान दूसरीकडे गेले, तर सत् पदाचे दर्शन कसे मिळेल? भक्ती सहज, साधी, सोपी आहे. ती कोणाला? अहंपणा व गर्व ज्याच्या ठिकाणीं नाही त्यांना ! त्यांना दर्शन सहज मिळते.
तो अहंपणा गर्व नाहीसा करण्याकरीता काय करावे? माया सर्वांना आहे. माया रहित कोणी नाही. आसनाधिस्तही माया रहित नाहीत. मायेचे दास बनू नका. आपण जर मायेचे दास बनलात तर ती हवे तसे लाघव करून पूर्णत्वाने कब्जा घेईल.
सेवेकऱ्याला मायावी भ्रमणातून मालिक वर काढतात. मात्र सेवेकरी मायावी जाळ्यात जास्तच गुरफटत जातात. नामस्मरणात बसताना सर्व विचार बाजूला ठेवा. माया त्याठिकाणी येणार नाही. जरी आली, तरी तिला विचारण्याचा सेवेकऱ्याला अधिकार आहे. पण केव्हा? सेवेकरी त्या पदाने गेला तर? असत मार्गी गेल्यास, ती लाघव केल्याशिवाय सोडणार नाही. सत मार्गी जाऊन जर, तिने लाघव केले, तर ते सेवेकरी हक्काने तिला विचारु शकतात. मग ती निरूत्तर होते. म्हणूनच सेवेकऱ्याची वागण्याची कृती, आचार, विचार – जो शब्द बाहेर टाकतो, तो विचार करूनच टाकावा. तो शब्द मालिक उचलून धरतात. जी जी कृती सेवेकरी करतो, जो बोल बाहेर फेकतो, त्या सर्वांची नोंद होत असते. सेवेकऱ्यानो लाघव करण्यास वाव देऊ नका. सेवेकऱ्याने सत पदाने चालावे असे मालिक नेहमी म्हणतात. आपला सेवेकरी बाहेर गेल्यानंतर त्याला सदगुरू पदानेच मान मिळाला पाहिजे. तो मिळण्याकरीता मी पणा, गर्व, अहंकार यांचा नाश करा. त्यांचा नाश झाल्यानंतर सर्व काही बरोबर होईल. आपण जी भक्ती करतो, ती फार कठीण आहे. कोणाला? – ज्याला वळण नाही, त्यालाच ती कठीण आहे. ©️