समर्थ रामदास स्वामी –संसार –
संसार त्रिगुणात्मक आहे. त्या संसारात राहूनच सगुनाचे सार घेणे. याचेच नाव संसार होय. याच्यातच सदगुरू पूर्णपणे भरलेले आहेत. याच्या निराळा संसार नाही. सद्गुरु सुद्धा संसारमय आहेत. ज्याने संसार नीटनेटका केला, त्याला परमार्थ साधता येतो.
संसार हा मार्ग आहे. त्या मार्गातूनच निर्गुणाचा शोध घ्यावयाचा. ते शोधण्यासाठी संसाराचा सार घ्यावयाचा असतो. तो सार घेतल्याशिवाय मिळणार नाही. संसार म्हटल्यानंतर मायावी भ्रमण आहे. मायावीमध्ये सदगुरू पूर्णपणे भरलेले आहेत. ते त्रिभुवन व्याप्त असून अलिप्तही आहेत. संसारात राहूनच त्रिभुवन व्याप्त सदगुरू कसे आहेत ते पहावयाचे असते. ते पाहिल्या नंतरच अलिप्त सदगुरू कसे आहेत, याची जाणीव मिळेल. संसार याचा अर्थ काय आहे?
सगुनमय दिसणारे सर्वस्व बीजारोपण म्हणजेच संसार होय. स्वतःचा परिवार, बायका, मुले म्हणजे संसार नाही. संसार हा फार व्यापक आहे. जे जे सचेतन, जे सदगुरूमय आहे, ते पहाण्यासाठीच संसार आहे. आपले घर, कुटुंब हा संसार नव्हें. कोणीही असो, त्याची प्रेरणा, सद्भावना यांचे मिश्रण ज्याठिकाणी, तोच संसार होय.
संसारामध्ये ज्याठिकाणी सत्, त्याच ठिकाणी सदगुरु आणि हा संसार सागर ओलांडून ते परब्रह्म निर्गुण पद आणि पलीकडे गेल्यानंतर तेजोमय वलय ! हे सर्वस्व स्पष्ट पहाण्यासाठी, निर्गुणपद अनुभविण्यासाठी संसार हि प्रेरणा केली आहे. संसार कशासाठी?
संसारामध्ये षड्रिपू अहोरात्र जागृतीत खडे असतात. ते कशासाठी? तर सगुनाचा सार घेत घेत निर्गुनाप्रत न्यावयासाठी. ज्याने सताची कास धरली, त्याला षड्रिपू स्वतःचा दास न बनविता, तेच त्याचे दास बनतात. जो सदगुरु चरणात लीन आहे, त्याला माया दास बनवित नाही. तर त्याची दासी बनते. संसार सागर ओलांडण्यास किती वेळ लागणार? संसार हा प्रत्येकाने आनंदमय वातावरण निर्माण करून, केला पाहिजे. (समाप्त)©️