म्हणून भक्ति कोणत्या अंगाने करावयास पाहिजे? सेवा कोणत्या अंगाने करावयास पाहिजे? हे मी सांगावयास पाहिजे का? प्रत्येक सेवेकऱ्याने याचे अंत:र्यामी शोधन करा. त्याप्रमाणे वाटचाल करा. पुढे सत् संचित, सत् सानिध्य लाभेल कसे याचा विचार करा. येथून पुढे असत संचित वाढवण्याचा प्रयत्न करू नये. आतापासूनच स्फटिका सारखा शुद्ध राहिला तर पुढे सत् सानिध्य त्याला लवकर मिळेल. माझ्या हातून वाईट कर्तव्य होणार नाहीत. मी सत संचिताचाच वाटेकरी होईन असे कोण छातीला बोट लावून सांगेल का?
आसनाधिस्त आत्तापर्यंत सांगून सांगून कंटाळले आहेत. आसनाधिस्तांच्या सांगण्याप्रमाणे, संदेशाप्रमाणे सेवेकरी वागत आले आहेत का? आले आहेत म्हणावे तर दर दिवस आरडाओरडा का? मग त्याने आत्मबोध घेतला आहे असे होईल का? मग आत्मा आणि त्याचा बोध घ्यायचा असेल तर आपण ज्यांना शरण आहोत तेच परब्रम्ह आणि त्यांच्याच सांगण्याप्रमाणे वाटचाल करणे सेवेकऱ्याचे कर्तव्य नाही का? त्यांच्या बोलाला मान्यता देऊन त्याप्रमाणे वाटचाल केली तर तो सेवेकरी गुरफटून जाईल का? तर नाही. मग असे सेवेकरी आहेत का? त्यांचे बोल जर मानावयाचे नाहीत मग त्यांना शरण जाण्याची काही आवश्यकता आहे का?
आसनाधिस्त म्हणजे एक मानव आहे, असेच सेवेकरी मनात समजतो नाही कां? मग त्यांचे बोल मानायला नकोत का? ते बोल मानीत नाहीत म्हणून ते गुरफटले जातात. म्हणून निष्काम सेवेत निमग्न होऊन, निरपेक्ष भावनेने वाटचाल करू लागला तर तो चुकणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. मग पुढे तो सत् संचिताचाच वाटेकरी जरूर होईल. अशा तऱ्हेने वाटचाल केल्यास त्याला आत्मबोध म्हणजे काय हे कळेल. पण ती ज्योत ज्योतिर्मय आहे, ती कशी आहे, हे त्यात निमग्न झाल्याशिवाय सांगता येणार नाही.
मग आकारी आहे की निराकारी आहे? अंत:र्यामी निराकारी आहे म्हणूनच तो सर्वस्व करू शकतो. मग आकारी म्हणायचे का निराकारी म्हणायचे? आकार नसेल तर बोलू शकणार नाही. पण आकार नसताना निराकारी बोलावे का? म्हणून सगुन आणि निर्गुण दोन्ही एकच आहेत. त्या तऱ्हेने वाटचाल करील त्याला आकार आणि निराकारी कळू शकते. तेव्हा सत् सानिध्याने वाटचाल करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आत्मबोधाची जाणीव मिळेल. बोल, प्रणव कोठून सुटतात हे कळेल. (समाप्त) ©️