त्याने (एकलव्याने) प्रतिमा जागृत केली. त्याच्यात अफाट गुरुभक्ति निर्माण झाली आणि तो एक आदर्श सेवेकरी झाला. त्याप्रमाणे व्हावयास पाहिजे. त्याने अहोरात्र काबाडकष्ट करून, विद्या संपादन केली. त्याने सद्गुरू मुखातून अमोल बोल आल्यामुळे हे केले. सत सेवेसाठी सत् सेवेकरी आपल्या प्राणाचीही पर्वा करीत नाही. अंगठा घेऊन काय करावयाचे होते? पण द्रोणाचार्यांना सत् किती आहे, हे पहावयाचे होते. ज्ञानाचा एकही बोल पाजलेला नसताना, एवढा माझ्यात रममाण झाला, पण सत पदाला किती चिकटलेला आहे, हे त्यांनी पाहिले. तो एकलव्य अमर झाला आहे. तसेच सेवेकरीही त्या पदाचे पाहिजेत.
सत्पदाच्या सेवेकऱ्याचा मान फार मोठा आहे. लहान मोठा, गरीब श्रीमंत, श्रेष्ठ कनिष्ठ असा येथे भेदभाव नाही. सर्व समान आहेत. तो या ठिकाणी लिन झाला पाहिजे. ज्याच्या ठिकाणी पूर्णत्वाने लिनता आहे, तो सेवेकरी चुकत नाही. लिनत्वावर सेवेकरी सत् पदाला गेलेले आहेत. असे या ठिकाणी आहेत व काही घसरलेले पण आहेत. साधे, सोपे आणि सुलभ असे हे आसन आहे. याचे आपण सेवेकरी आहात.
सेवेकरी चुकतात का? कारण मूल जन्माला आल्यानंतर बालस्वरूप ब्रह्मपद असते. पण ज्या वेळेला कलियुगाचा स्पर्श होतो, वारा लागतो, त्यावेळेला त्याचे ब्रह्मपद जरी अखंड असले, तरी चंचल गती निर्माण होते. त्याचप्रमाणे अनुग्रहाच्या वेळी बालगतीप्रमाणे तो लीन होतो. त्यावेळेला आत बाहेर काहीही नसते. पण बाहेरचा वारा लागला की, तो चुकतो. मग सद्गुरु काय करतात? सेवेकरी षड्रिपूत गुरफटला असताना, सद्गुरु आपल्या मुखातून बोल फेकतात व त्याप्रमाणे तो मुक्त होतो. पण मनाच्या तरंगात गुरफटतो, विसरतो व चुकतो. मग सद्गुरु तत्त्व हेलावते. अंत:करण शुद्ध असते. त्यांची एकच भावना असते की माझा सेवेकरी सतशुद्ध गतीने जाऊन या चरणांवर लिन झाला पाहिजे. (समाप्त) ©️