स्थुलाला स्थुलाची आवश्यकता आहे. सत् आहे. स्थुल हे माया रहीत नाही. पण माये मध्ये दोन शाखा आहेत – १) सत् आणि २) असत !
मानव धनाला भुलतो. पण ज्याने कनक आणि कांता सांभाळली तोच मोक्षाचे मार्गाने जाऊ शकतो. संतांनी सांगितले, धन म्हणजे संपत्ती ! मग स्थावर असो वा जंगम असो. म्हणून सेवेकर्यांनी धनासाठी मोहवश व्हावयाचे नाही. धनासाठी मी नाही. माझ्यासाठी धन आहे.
आपण जन्माला येतो त्यावेळेला सत् संचित अगर असत संचित बरोबर घेऊन येतो. जन्माला आला त्या वेळेला अदृश्य धन बरोबर येते. सत् संचिताने चांगली गती मिळते, तर असत संचिताने अघोर गती मिळते. परब्रम्हाचा याच्याशी काहीही संबंध नाही. जड तत्व मनाच्या आहारी जाते. यामुळे मन हे मोहवश होते. म्हणून सेवेकऱ्याने मोहवश व्हावयाचे नाही.
स्थुलांगी मनुष्याजवळ दोन पैसे नाहीत तर त्याला दुकानदार उभा करणार नाही. धनाचा जो मोहवश झाला, त्याला धन फसविते. “मी धनासाठी नाही, तर धन माझ्यासाठी आहे” ही धारणा पाहिजे.
लक्षात ठेवा, मी प्रथमच सांगितले, स्थुलाला स्थुलाची आवश्यकता आहे.” जरी मायेचा पसारा आहे, तरी हे कर्तव्य आहे. मायेचा आशक होता कामा नये. म्हणून मोहवश होणे ही चूक आहे. जो सताच्या चाकोरीतून जाण्याच्या मार्गात आहे, तो शक्यतो धनाची किंमत शून्य समजतो. पण धन हटकून त्याच्या पाठीमागे येते. जो धनाच्या पाठीमागे लागतो, त्याच्यापासून धन दूर पळते.
स्थुलासाठी स्थुलाची आवश्यकता आहे. पण त्या ठिकाणी आशक मात्र होऊ नये. म्हणून मुख्य जे आहे ते धन आहे. कनक आणि कांता मालकांनीच प्रसवलेले आहे. जे संत महात्मे होऊन गेले, ते धनाच्या पाठीमागे लागले होते कां? मानव कधी दुःख मागतो कां? पण कुंतीने श्रीकृष्णा जवळ सुख मागितले का? भर्तृहरी सारखे अवतारी पुरुष मोहवश झाले तर तुमची आमची काय अवस्था आहे?
स्थुलाला धनाची आवश्यकता आहे. पण सूक्ष्मात गेल्यानंतर धनाची आवश्यकता नाही. स्थुल सूक्ष्माला धरू शकत नाही. म्हणून धन लोभी होऊ नका. धन आपल्या पाठीमागे आले पाहिजे. म्हणून भावना नि:ष्काम ठेवा. सकाम ठेवू नका. भगवंताने प्रारब्धाप्रमाणे प्रत्येकाला धन दिलेले आहे. कोणाच्या नशिबात श्रीखंड असेल तर कोणाच्या नशिबात कोंडा असेल. पण हे सर्व प्रकारचे खेळ आहेत. (समाप्त) ©️