आज जे काही सांगत आहे, त्यावर मन:पूर्वक विचार करा. आपणालाच आपली उत्तरे मिळतील. सत् मार्ग कसा आहे, त्याची जाणीव मिळेल.
आपले गुरू कोण? ज्यांच्यापासून अखंड ध्वनी, अनुग्रह मिळाला, तेच आपले गुरु होय. प्रथम गुरूंचे दर्शन, नंतर पुढील सर्व !
ज्यांच्या मनात मी–तू पणा आहे, तो सोडून द्या. देव एकच आहे. एकच परम तत्व आसनावर खडे होते. कोणत्या सेवेकऱ्याने वर्णन केले का?
त्या चैतन्यमय गाभ्यातून, प्रकाशमय कल्लोळात शिरल्यानंतर, आणखी पुढे गेल्यानंतर प्रकाशमय ज्योत फाकते. त्याच्याही पुढे गेल्यानंतर अखंड तत्व ! परंतु प्रकाशमय ज्योतीच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही. नंतरची स्थिती कोणालाही सांगता येणार नाही.
आपला मुख्य दरबार प्रगट होणार आहे. प्रत्येक सेवेकऱ्याला सद्गुरुमय बनवून घेणार आहे. सेवेकरी म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरु होय. परंतु सेवेकऱ्याना कळत नाही. मालिक जितके दयाघन, तितकेच कठोरही आहेत आणि असतात. आज अखंड तत्व खडे आहे.
आपले सेवेकरी दरबारात हजर असताना, प्रत्येकावर नजर टाका. प्रत्येकाची छाननी घ्या. सत् मार्गी सेवेकऱ्यास दोष देणे, हा गुन्हा आहे. असत मार्गी जाणाऱ्या सेवेकऱ्यांवर लाघव करण्याचा हक्क आहे. मालकांना लिला, लाघव करण्यास वाव देऊ नका. लाघव झाल्यास सेवेकऱ्याने हक्काने विचारले पाहिजे. लाघव का व्हावे? हा सुद्धा सेवेकऱ्यांचा अधिकार आहे. शक्यतो सत् मार्गी ज्योतीला लिला, लाघव नाहीत. त्या रितीने आपण बना. तसे बनलात म्हणजे, लाघव करण्याचे कारण नाही. (समाप्त)©️