रुप, रस, गंध, बोल किंवा शब्द व स्पर्श हे जरी वेगवेगळे विषय असले, तरी ते विषय न राहता विकार ह्या अर्थी भक्तिमार्गात वापरले जातात.
आपणांस कल्पना आहेच की विकार म्हटले कि मानव हा त्यात भरडला जातो, भरकटला जातो. विकार किंवा विषय हे एखाद्या रोगासारखे असतात. त्यांचा परिणाम मानवांवर झाला की मानवाचे कोटकल्याण न होता, तो त्यात वाहवत जातो व शेवटी त्याचा घात होतो.
आपल्या मालकांनी ह्याचीच जाणीव करुन देताना आपणांस कांही उदाहरणे दिली आहेत. तसेच साधू संतांनी देखील या विषयांवर भरपूर विचार तसेच अभ्यास करून त्यांच्यापासून उद्भवणारे धोकेही लक्षात आणून देण्याचा प्रयत्न परोपरीने केला आहे.
संत एकनाथ म्हणतात, ‘ते हे पंच विषय प्रमाण। पाचचि परि आति दारूण। ब्रह्मादिक इही नाडिले जाण। इतरांचा कोण पडि पाडू।।
विषयाचे ते गोडपण। ते विखाहून दारूण। विष एकदा आणि मरण। पुन: पुन: मरण विषयाचेनि।
पुढती जन्म पुढती मरण। हे विषयास्तव घडे जाण। संसाराचे सबळपण। विषयाधीन उद्धवा।।’ (एकनाथी भागवत)
तर ज्ञानेश्वर म्हणतात, जन्म-मरणाचा फेरा चुकविण्यासाठी, म्हणजेच मोक्षप्राप्तीसाठी मंदिरात दर्शनाला जायचे असते. तेव्हा विषयापासून दूर राहणे आवश्यक असते.
रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श हे पाच विषय एकएकटेदेखील मारक ठरतात. मातंग, कुरंग, पतंग, मीन आणि भृंग यांचा नाश क्रमाने एकेका विषयाने होतो, हे तर सर्वज्ञात आहे.
आपणास तर पाच विषयांनी ग्रासले आहे. रूपाचेच उदाहण घ्या. रूप माणसाच्या मनात विषय निर्माण करते; त्यामुळे काही वेळा सर्वनाशही ओढवतो. दिवा आणि पतंग यांचा दृष्टांत सर्वपरिचित आहेच. ‘पतंगा दीपीं आलिंगन। तेथ त्यासी अचूक मरण। तेवी विषयाचरण। आत्मघाता।।’ (ज्ञानेश्वरी)
रूपाचा हा प्रताप ध्यानी आणून देण्यासाठी उर्वशी, मेनका, तिलोत्तमा अशा अप्सरा काही मंदिरांवर शिल्पीत केलेल्या आढळतात. तेथे देवदर्शनाला जाणाऱ्याने सावध व्हावे म्हणून!
उर्वशीने पुरुरव्याला घायाळ केले, मेनकेने विश्वामित्राचे स्खलन केले आणि तिलोत्तमेने तर देवालाच मोहित केले. थोडक्यात असे, की रूपाच्या आमिषाला राजा किंवा ऋषीच काय, तर देवही बळी पडतात. तुमच्या-आमच्यासारख्या सामान्यांचे काय? तेव्हा, सावध व्हा!
मालिक सांगताहेत, “या पाचही विषयांवर जो स्वार झाला, त्याची गती काय होत असेल?” तर तो या पंच विकारांनी ग्रस्त होतो व शांती, सुख, समाधान हरवून बसतो. ज्या मानवांनी हे हरविले, ते अर्थातच आपल्या सद्गुरूंपासून दूर जातात. पुढे ते म्हणतात, “या विषयांपासून आपण अलिप्त राहावयास पाहिजे.”
तसेच आठवण करून देताना म्हणताहेत, “पण हे इतर मानवांसाठी आहे. येथील सेवेकऱ्यांसाठी नाही. विषयाचा त्याग करून, आसनाधिस्तानी दिलेल्या मार्गावरुन वाटचाल केल्यानंतर कसलीही अडचण भासणार नाही. संकटे येणार नाहीत. येऊ देणार नाहीत. पण या तत्त्वांचे आकलन करून वाटचाल करील तर या चौकटीत तो बसेल. मग तो वरील बाबतीत बोलू शकतो. त्याला जिकडे तिकडे सतच दिसते. सांगितल्याप्रमाणे वाटचाल करून, मनन करून सद्गुरु सानिध्यात वाटचाल करणे. अशी वाटचाल करील, तर मग वरील वाक्य शोभते. नाहीतर “बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात”.
पुढे ते म्हणताहेत, “पण येथील स्थिती (दरबारातील) जी आहे, ती म्हणजे, येथे प्रत्यक्ष कृती केली जाते आणि नंतर सांगितले जाते. दुसरीकडे (बाहेर) अशी स्थिती नसते. येथे खूप असले तरी सांगणे मर्यादित असते. सेवेकऱ्यांनी विषयांपासून अलिप्त राहावे हेच ते पुन: पुन्हा सांगताहेत. ©️