श्री स्वयंभू- महाशिवरात्र – पूर्णांत पूर्ण असे परमनिधान वेगळे आहे. मलाही पूर्ण म्हणता येणार नाही. पूर्ण जे आहे ते एकच आहे. अणू, रेणू, परमाणु याच्याही पलीकडे असणारे जे स्थान तेच पूर्ण आहे. त्यांनी जगताच्या कर्तव्यासाठी जी तत्वे निर्माण केली आहेत त्यातीलच मी एक तत्त्व आहे. हे सत्य आहे अन जे वेगळे, ते सत आहे. त्यालाच पूर्णत्व आहे. ओंकारबीजाचे वर्णन अनेकांनी अनेक तऱ्हेने केलेले आहे.
ओंकार बीज हे फार निराळे आहे. त्याची गती घ्यावयाची म्हटले तर घेता येत नाही. ओंकार बीज हे अंकुराप्रमाणे चिन्मय स्थितीत असणारे फार फार वेगळे आहे. त्याची स्थिती, गती फार वेगळी आहे. त्याचे वर्णन किती करावे? तरी पण अणू, रेणू, परमाणु याच्याही पलीकडे; उत्पत्ती, स्थिती, लय याच्याही पलीकडे असणारे असे ते बीज आहे. त्याला गंध नाही, आकार – विकार काही नाही असे असणारे ते, त्याचे अस्तित्व फार वेगळे आहे. तो परमानंद फार निराळा आहे.
ओंकाराच्या पलीकडे असणारे जे परमस्थान त्याला रंग, रूप, आकार, विकार काही नाही. असे ते परम निधान फार वेगळे आहे. त्याच्याच पासून ओंकार बीजाची निर्मिती झाली अन ओंकारापासून जगत आणि त्याचा विस्तार आहे. आम्ही सर्वस्व मार्ग आक्रमण करीत असतो. गती घेत असतो. त्याच्या अनुरोधाने सर्वस्व उलथापालथ, उत्पत्ती, स्थिती लय होत असतात. त्यांनी निर्माण केलेली तत्त्वे भूतलावर वावरत आहेत. मात्र याची जाणीव मानवांना देणारा कोणी नाही, की हे सर्वस्व एकाच बिजापासून आहे. याची जाणीव नाही. जीव अन शिव तेच आहेत. ओंकारातच हे सर्वस्व आहे. ओंकारापासूनच हे निर्माण आहे. ओंकार हे एकच बीज त्रिभुवनात भरून सुद्धा उरले आहे. यामुळे त्याला शंकर म्हणा अगर काही म्हणा ते मानवाच्या मनाचे कोड कौतुक आहे. जीव आणि शिव हे ओंकाराच्या निराळे नाही. या बीजातच सर्वस्व आहे. ओंकारच हे नटलेले आहे. त्याच्या पासूनच त्रिगुणांची निर्मिती झाली. मग त्रिगुण म्हणा, आणखीन काही म्हणा याच्या निराळे नाहीत. या बीजातच सर्वस्व आहे. सर्वस्व एक आहे. रूपे अनेक असतील; रूपे अनेक झाली तरी त्यातून ते बाहेर नाहीत. मानवांना वाटाड्या नसल्यामुळे, ते मनाच्या गतीने जातात. अंधश्रद्धेने का होईना त्या ठिकाणी जातात. ( पुढे सुरु…२ )©️