अलख – चार दिशांना चार दरबार ! या चार दरबारांपैकी हा एक दरबार आहे. याच दरबारात (सताचे) प्रत्यक्ष येणे असते. येथेच अमौलिक बोल आपणाला ऐकावयास मिळतात. ते बोल जतन करून ठेवा. दरबारातून गेल्यानंतर, ते बोल विसरू नका. त्यांची आठवण ठेवा. स्वतःमध्ये असणारा अहंपणा, मी-तू पणा नाहीसा करा. सर्वजण बहीण – भावंडाप्रमाणे वागा ! शेजाऱ्यासारखा दूजा भाव ठेवू नका.
आपण नामस्मरण करतो. तेव्हा ती एकचित्तता कशी साधेल, या विषयी प्रत्येकाने धडपड करा. आपले मन, जर एकाच मार्गानें जाईल, तर हे होण्यास वेळ नाही. (मन मायेच्या अधीन होऊन, सैरावैरा भटकू देऊ नका.)
मालिक प्रत्येकाच्या हृदयी आहेत. ते कसे? प्रत्येक मानवाचा जो हृदय रुपी पिंजरा त्यात ते बसलेले आहेत, ते प्रत्यक्ष पहा. ते जर (तेथे) नसतील, तर प्रत्यक्ष कृती होणार नाही. त्यांचे लक्ष नसेल, तर मानव काहीही करु शकणार नाही. (गुरू गुह्य)
मानवाला जन्माला घातल्यावर तेच अहंपणाने म्हणतात, आम्हीं सांभाळतो! पण व्यर्थ आहे. मालकांच्या मनात जे करावयाचे, ते कितीही आड पडदे आले तरी, करून घेणारच ! अजून मालिक कडक झाले नाहीत. नियम म्हणजे नियम ! जे असत मार्गाला जातील, त्यांच्यावर लिला, लाघव इतकेच काय, शिक्षा सुद्धा होईल. यापुढे जे सत् असतील, तेच सेवेकरी होतील. (समाप्त)