मालिक एकचित्त –श्रीकृष्ण जयंती – ज्या ज्या वेळेला पृथ्वीवर, भूतलावर प्राणी, वनस्पती, मानव निर्माण केल्यानंतर जस जशी गती होत गेली, तस तसे अवतार कार्य नटवावे लागले. ज्या ज्या तऱ्हेचे अघोरांचे प्राबल्य त्या त्या तऱ्हेचे अवतार कार्य नटवावे लागते. आतापर्यंत अवतार कार्य झाले, तसे आता पण अवतार कार्य सुरू आहे. त्याची कालगणना सुरू आहे. त्याप्रमाणे अवतार कार्य नटवले आहे.
काळ अगदी समीप आला आहे. आमच्या वेळेला उघड असताचे प्राबल्य मातले होते. त्याचा नाश करण्यासाठी कशा युक्तीने कार्य केले याची आपणास जाणीव आहे. तिच तऱ्हा, पण त्याहीपेक्षा प्रत्येक मानवाची गती फार निराळी झाली आहे. कलह माजला आहे. असताच्या पाठीमागे लागून सर्वस्वाचा नाश होण्याची पाळी आली आहे.
काळ अगदी समीप आला आहे. आतापर्यंत अवतार कार्य नटवली त्या प्रत्येक अवतार कार्यात समोरासमोर गती घेता येत होती. पण आता ही स्थिती राहिलेली नाही. पावलो पावली बुद्धी बदलते आहे. अशा मानवांना शुद्धीवर आणण्यासाठी कोणती कलाटणी द्यावयाची याचे निवेदन चालू झाले आहे. आपण म्हणाल कधी आणि केव्हा? पण ते मलाही सांगता येणार नाही. कालचक्र सुरू झाले आहे. ज्यावेळेला स्थित्यंतरे घडतील त्याच वेळेला आपणाला उज्वल कार्य करावयाचे आहे. मानवांची चाळण मारावयाची आहे. हा काळ जरी पुढे पुढे जात असला तरी पण हे होणार हे निश्चित ! जोपर्यंत त्याचा घडा भरला नाही तोपर्यंतच त्याची स्थिती असते. मात्र एवढेच, हा जयद्रथ आणि हा सूर्य ! तसा प्रत्यक्ष घडण्याचा काळ दूर आहे, पण हे होणारच, घडणारच. हे सत्य आहे. त्यावेळेला आपण जागृत राहून कार्य करावयाचे आहे. त्याप्रमाणे जागृत राहणे हा आपणाला संदेश आहे.
आराखड्याची वेळ आल्यानंतर सर्वस्व निवेदन होईल. चार-पाच वर्षांमागे थोडी चुणूक दाखविली होती, पण विचारांती स्थगित केले. माझ्या वेळेला अर्जुनाला शेवटपर्यंत थांगपत्ता लागू दिला नव्हता. ज्यावेळेला तो प्रत्यक्ष युद्धाला उभा राहिला, त्याच वेळेला आराखडा दिला आणि कार्य साधून घेतले. म्हणून आत्ताच आराखडा देता येत नाही.
ज्याच्याकडून कार्य करून घ्यायचे त्याच्याच गतीने गेले पाहिजे, म्हणून आधी आराखडा देण्यात येत नसतो. आधी देऊन गमक राहत नाही.
मानव ज्यावेळेला निर्माण केला, त्यावेळेला “आणखीन” हे गाठोडे त्याच्याबरोबर दिलेले आहे. जे जे मानवाला करता येईल ते ते करण्यासाठी, युक्त्या, प्रयुक्त्या त्याने निर्माण केल्या. त्यामुळेच हे कलियुग निर्माण झाले आहे.
मानव आहे, त्यात समाधानी असेल तर अवतार कार्य नटविण्याचे कारण नाही, पण मानव समाधानी नव्हते म्हणून अवतार कार्य नटवले. मानव स्वतःला किंमत देतो पण ज्याने जन्माला घातले त्याला विसरतो त्यामुळे त्याचा नाश होतो. जो मानव समाधानी आहे त्याला काही कमी नाही. ज्या वेळेला “आणखीन” डोळ्यासमोर उभे राहते त्यावेळी षड्रिपूच्या जाळ्यात तो आपण होऊन गुरफटतो. मग त्याला सत दिसत नाही. जे दिसेल ते तो करीत सुटतो. असे जे मानव, तेच राक्षस होत. तोच मानव अनाचाराला प्रवृत्त होतो. अशा तऱ्हेने अराजकता माजते आणि मग अवतार कार्य घ्यावे लागते. तोच काळ समीप आला आहे. मध्यान्ह उलटलेली आहे. पुढचे पर्व सुरू झालेले आहे. या योगे जी स्थित्यंतरे येतील ती महान पदाची आहेत. यातून जे साध्य होईल तेच सत् ! मध्यान्ह उलटण्याचा काळ कठीण असतो. बराचसा लांब असतो. आता मध्यान्ह काळ चालला आहे. तो ओलांडला नाही.©️