हिरण्यक राक्षस फार माजलेला होता. मग त्याच्याच बालकाकडून कार्य करून घेतले. एका हिरण्यकासाठी किती रगडले गेले? प्रल्हादा मागे सुद्धा सात्विक ज्योती होत्या. त्यांचाही बचाव झाला नाही, मग सताला अजिबात त्रास होऊ नये का? त्यांना फुलासारखे ठेवू का? म्हणून मानवांना सर्वस्वाची जाणीव असून सुद्धा, मानव चुकतो का? क्षमा मागतो का?
येथील एकही सेवेकरी पूर्व संचितातून मोकळा झालेला नाही, असे असताना सुद्धा आणखी संचित वाढवीत आहेत. बहुत जन्मीचे सुकृत असेल, तर तो त्या वेळचा प्रश्न आहे. यात दोनच ज्योती माझ्यात लिन करून घेतल्या आहेत. बाकी आता जे सेवेकरी आहेत ते पाहूया, माझ्यात कधी मिलन होतात ते ! जी ज्योत माझ्यात अगदी तल्लीन झाली, ती केव्हाही असे प्रश्न विचारणार नाही. जी ज्योत पूर्णत्वाने सतात रममाण झाली, सर्वस्व विसरून गेली, ती ज्योत असे प्रश्न विचारील का? जी समर्थ चरणात तल्लीन झाली, ती सुखदुःखाचे प्रश्न विचारणार नाही.
शिशुपालाचे १०० अपराध होईपर्यंत मला काही करता आले नाही. कोणतीही गोष्ट अती झाल्याशिवाय माती होत नाही. १४ चौकड्यांचे राज्य करणारा रावण यांने किती वर्ष राज्य केले. सताने किती त्रास सहन केला? त्या वेळेला अवतार कार्य नटवावे लागले. अती झाल्यानंतर काहीतरी करावे लागते. म्हणून सतासाठी मी वाटेल ते कर्तव्य करतो व सताला वाचविण्याचा प्रयत्न करतो. यातून जे घडते ते चांगल्या रितीने घडते. हे ध्यानात ठेवा. आसनाधिस्त मला जाणतात. मी त्यांना जाणतो. म्हणून जे घडते आहे ते पाहत राहणे. मी आता इतकेच सांगतो की आत्ता तरी सेवेकरी सत बनण्याचा प्रयत्न करतील अशी मी अपेक्षा करावी काय? (समाप्त) ©️