ओमचे उच्चारण करताना आपण ते कोणत्याही स्थितीत बसून करु शकता. परंतु विशेषकरून जमिनीवर बसून पद्मासन वा सुखासन घालून बसून करणे यथायोग्य होईल. अशाप्रकारे बैठक साधल्यानंतर, डोळे मिटून घ्या व शांतपणे आपले लक्ष दोन भुवयांच्या मध्ये एकवटून दीर्घ श्वास घ्या आणि पोटातूनच अ चे उच्चारण करता करता छातीजवळील भागात आल्यावर तोंडाचा चंबूसारखा (गोल) आकार करून ओ चा उच्चार करीत ओठ बंद करुन म चे उच्चारण करा. ह्यामध्ये असेही म्हटले जाते की, जेवढे दीर्घ पध्दतीने हे उच्चारण करता येईल तेवढे ते उत्तम होय.
ॐ कार जपाचे लाभ – ॐचे उच्चारण ५, ७, ११ आणि २१ वेळा करने लाभदायक ठरते असे मानले जाते. तसेच पहाटेच्या वेळी वा झोपायला जाण्यापूर्वी हे जप करने फायदेशीर होऊ शकते. ह्याच्या जपामुळे मानसिक व शारीरिक रूपात शांती प्राप्त होते. आपल्या आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्याचा लाभ आपणास होतो.
जेव्हा आपण नाभीतून पूर्ण एकाग्रतेने ओम चा जप करतो तेव्हा आपली चेतना उर्ध्वग्रामी होते आणि शेवटी ब्राह्मी अवस्थेत पोहोचते. यालाच सुप्त कुंडलिनी शक्ती जागृत झाली असे म्हणतात. असे म्हटले जाते की, नैसर्गिक श्वासाप्रमाणे नामाचा सतत जप हा आपला स्वभाव बनला पाहिजे. ओंकाराचा जप केल्याने मुक्ति आणि मोक्ष दूर नाही.
ओंकार जप केल्याने आपला श्वास शुद्ध होतो आणि अध्यात्मिक प्रगती सोबतच शारीरिक स्वास्थ्यही लाभते. याचबरोबर मानसिक शुद्धी, आत्मज्ञान, हृदय विकास आणि अध्यात्म प्रगटीकरण होते. तसेच भौतिक कल्याण व तेज आणि तेजस्वी बुद्धी यासारख्या गोष्टीही प्राप्त होतात. ओमकार जप केल्याने आपला श्वास नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते. एकाग्रता वाढते व सांसारिक आणि अआध्यात्मिक या दोन्ही क्षेत्रात सर्वोत्तम प्रगती होऊ शकते. (समाप्त)