चैतन्य ! सर्व ठिकाणी भरून उरलेले, परात आहे त्याच्याही पलीकडे आहे. चरातही आहे आणि परातही आहे. सर्व ठिकाणी आहे. पाहणाऱ्याला पाहता येते, न पाहणाऱ्याला सापडत नाही. अशी ही चैतन्यमय स्थिती सेवेकरी अनुभवतात. इतर मानवांना त्याचा अनुभव नाही. अनुभवाशिवाय गोडी लागेल का? हेच जडत्व, ध्यानात लागल्यानंतर विसरले जाते. त्याला कशाचीही शुद्ध राहत नाही. चैतन्य ! सर्व ठिकाणी व्यापक आहे हे सेवेकऱ्यांनी पहावे. पुढील स्थिती मी सांगत नाही. त्याने स्वतः अनुभव घ्यावा. कानाने ऐकले ते अनुभवात किती उतरले? अनुभवाचे श्रुतीत किती उतरले? पापाचे संचित देहासी दंडना | तुज नारायणा दोष नाही ||
नारायण कसा आहे? हेच चैतन्य सर्व ठिकाणी व्यापक आहे. प्रकृत्तीला चेतना आहे. त्यालाच नारायण म्हणा. सद्गुरु म्हणा ! या आकाराला चिन्मय स्थिती नसेल तर त्या आकाराला काही किंमत आहे का? अर्थ आहे का? चैतन्यमय सर्व प्रकृतीत आहे, पण जे काही खोडसाळपणा करतात त्याना सांगणे. प्रकृतीकडून गुन्हे होतात ते नारायणामुळे होतात का? का चैतन्यामुळे होतात? का आणखी एक कशामुळे होतात? ज्या मानवाने नारायणाचा अंत घेतला नाही, कोणत्या स्थितीत काय आहे हे पाहिले नाही, त्या मानवाला माझी गती नाही. बरे, मानव काय म्हणणार आहे? काय करणार आहे? तो मानव म्हणतो, मीच सर्वस्व करतो. बालपणा नंतर तरुणपण येते. त्या भरात तो काय बोलेल, काय करील याचा अंत सापडत नाही. मग त्याची जबानी बदलल्यानंतर एकदम थकल्यानंतर काय होते? बालपण आणि म्हातारपण म्हणजे बालपणाची स्थिती. तिच स्थिती त्याची असते. म्हणजे म्हातारपणात त्याला प्रकृतीची शुद्धी राहात नाही. जवानीत काय केले, हे म्हातारपणात कळत नाही. ©️