श्री समर्थ मालिक – “आधी बीज एकले | आधी बीज, त्यानंतर फळ! फळात परत बीज निर्मिती! त्याचा मानव उपभोग घेतो. मुळात बीज कोठून निर्माण झाले? बीजाची पैदास कोठून झाली? त्याचा मानवाने शोध घेतला आहे का? “आधी बीज एकले” ……… असे संताने म्हटलेले आहे, पण ते बीज कोठून आणि कसे निर्माण झाले, कोणी दिले, याची कल्पना मानवांना नाही. हा बीज देणारा जो आहे, त्याचा शोध लावल्यानंतर, कोणत्या गोष्टीची न्यूनता भासेल का? कमतरता येईल का? तर नाही. हे सत्य आहे ना? मग त्या बीज दात्याला आपल्या हाताशी धरले किंवा त्याला आपलेसे करण्यासाठी काय करावयास हवे?
शुद्ध स्फटिकासारखा सेवेकरी होणे फार दुरापास्त आहे. टाकीचे घाव सोसून, सोसून तो शुद्ध होतो. नाहीतर आले आमच्यावर आणि आले तुमच्यावर! शुद्ध स्फटिकासारखा सेवेकरी असेल तर तो असे उत्तर देणार नाही. शुद्ध स्फटिकासारखा सेवेकरी याचा मनात विचार करून शोध घेत असतो. त्याप्रमाणे तो करीत असतो. हे कसे आहे? ज्याने आशा, मनीषा, तृष्णा, वासना, मी, तू हे सर्वस्व मारले आहे, तो सेवेकरी काय म्हणतो? चूक जरी नसली, तरी चूक माझी आहे. मी चूकीस पात्र आहे. देईल ती शिक्षा भोगण्यास तो तयार असतो. सेवेकरी अगदी लिन, म्हणजे मातीचा खडा जसा पाण्यात विरघळून जातो, त्याप्रमाणे सेवेकरी प्रणव टाकल्याबरोबर लिन होईल, तर समर्थ शिक्षा देतील का? असा सेवेकरी असेल, तर त्याने भक्तीचे वर्म जाणले असे होईल.©️