श्री समर्थ संदेश – गुरुपौर्णिमा सत् शुद्ध अंतःकरणाने प्रेरित होऊन सद्गुरू चरणांवर बहाल केलेली सेवा थोडी का असेना ही पूर्णत्वाने रुजू आहे. हे करताना सेवेकरी आतून आणि बाहेरून हेलावून गेला पाहिजे. करायचे म्हणून करायचे, हे ओझे म्हणून ठेवले आहे म्हणून करायचे, तर हे केलेले चरणांवर रुजू होत नाही, पण अंतःकरणापासून आपण केले, तर ते प्रेमभराने रुजू करावे लागते.
‘सद्गुरू पद’ हे असे आहे. त्यांना काय पाहिजे, हे सेवेकऱ्याने जाणावयाचे असते. आजच्या शुभदिनाचे महत्त्व ज्या सेवेकऱ्याने ओळखले, जाणले त्याला ‘सत सेवेकरी’ हे नामाभिधान आहे. गुरुमुखातून मिळालेला उपदेश ज्यांच्या रोमा रोमातून भिनला आहे, त्यांच्यासाठी हा शुभदिन “गुरुपौर्णिमा” आहे.
सद्गुरु मुखातून सेवेकर्याकडून पूजेची अपेक्षा नसते, पण हे सेवेकऱ्यांनी जाणवयाचे असते. आसनाचा सेवेकरी झाल्यानंतर, प्रथम सद्गुरुमय व्हावे लागते. सेवेकरी सद्गुरु चरणात लिन होणे म्हणजे काय? तर सर्वस्व स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण सद्गुरुना अर्पण करणे होय. मग शेवटी काय राहते? सद्गुरु चरणात लिन होऊन शुद्ध शुचि:र्भूत अंतःकरणाने केलेली सेवा ही रुजू असते. सबंध वर्षात आपण काय केले, त्याचेच प्रतिक हा शुभदिन होय. हे ज्या सेवेकऱ्याने ओळखले, जाणले तो सेवेकरी भाग्यवान होय. ©️