प्रकृती कोणाचे आधीन आहे? मन कोणाचे आधीन आहे? मनाला चेतना मिळते म्हणून ते बोलते. मनाला काही आहे की नाही? मनाला नाक, कान, डोळे, तोंड काही नाही ना? मग हे सर्वस्व मनाला आहे हे कोणाचे आधीन आहे? हे मनच अकरावे इंद्रिय आहे. याला शांत करण्याचा प्रयत्न करा. कोणी याला शांत करील? कोण याला शीतल करील? ती ठेव आपल्याजवळ दिलेली आहे. तेच मनाला शांत करील.
मन म्हणजेच माया. प्रकृती म्हणजेच माया. यामध्ये ते कसे चुपचाप वास करून आहेत? ते कोणालाही सांगता येणार नाही. प्रकृतीची हालचाल सताच्या सत्तेने चालते. ते नसतील, तर हालचाल होणार नाही, मग मनात प्रकृतीचे चोचले कशाला हवेत? पण सर्वस्व सद्गुरु अर्पण केले की त्या वेळेला ते विचार करतात, कोण काय करतो? कोणाकडून काय करून घेतो? ही गती सेवेकऱ्यांना माहित आहे. याची जाणीव ठेवली तर सेवेकरी आड मार्गाला जाणार नाही. तेव्हा सेवकऱ्यांनी एकमेकाबरोबर वादविवाद करू नयेत. सेवेकर्यांनी एकमेकांबरोबर आदर भावनेने राहावयास पाहिजे.
सताला कवटाळून राहिलात तर मला वाटत नाही की सेवेकरी संकटात सापडतील. सेवेकरी सद्गुरूंना धरून राहिला तर कसली बाधा होईल का? पण त्यांना धरता येत नाही, पकडता येत नाही. पकडतील केव्हा, तितक्या पात्रतेचा सेवेकरी असेल तेव्हा! ज्याने पकडले तो सेवेकरी धन्य होय. मग मुक्ती मोक्ष राहिला का? याप्रमाणे सेवेकऱ्यांनी वागण्याचा प्रयत्न करावा. (समाप्त)©️