ऋषीपत्नी सौ माधवी – कण्व मुनींची अर्धांगी. आपल्या स्थूलांगी सेवेकऱ्यांच्या संसारात काही वेळेला वाद उत्पन्न होतो. अनेक वेळेला आसनाधिस्तांनी सांगितले आहे, संसार करुनच परमार्थ साधावा. त्याशिवाय परमार्थाची जाणीव मिळणार नाही.
तुमचा संसार लहान आहे. मोठा नाही. सध्याच्या सेवेकऱ्यांना चार पाचच मुले असतील. त्यावेळी आश्रमात किती मुले येत होती? ती सर्व आश्रमातच राहत होती. त्यांना अशा तऱ्हेने वागविले जात असे की, प्रत्यक्ष जन्मदात्या आई-वडिलांची त्यांना आठवण होत नसे. त्यांचे आईबाप त्यांना दोन-तीन वर्षाचे असताना आश्रमात आणून टाकीत असत. अशा मुलांची त्यांच्या वयोमानाप्रमाणे जी जी कार्ये, ती सर्व करावी लागत असत. त्यावेळी शकुंतला अगदी खरोखर लहान होती. दोन-तीन वर्षाचे मूल पत्करले, पण लहान मूल पत्करत नाही. अशा तऱ्हेची स्थिती असताना, निराशा कधीही नव्हती.
जे माऊलीने कार्य दिले, ते करावयास पाहिजे. संसार करूनच परमार्थ साधावयाचा आहे. असे प्रत्यक्ष माऊलीचे बोल आहेत. मग संसार नको का करायला? सध्याचा संसार कठीणच आहे. पण आपल्या सेवेकऱ्यांना कठीण नाही. असे असताना संसार करणारा मी कोण? करून घेणारे निराळे आहेत. त्यांना काळजी नाही का? असा ठाम निश्चय झाल्यानंतर संसारात कोणतीही बाधा अगर उणीव भासत नाही. थोडक्यातच, मालिक सर्व भागवितात आणि त्यातूनही शिल्लक उरवतात. (पुढे सुरु….१)©️