श्री समर्थ मालिक – आपण सर्वस्व चरणांवर वाहिल्यानंतर हे कार्य कसे होईल हे विचार आपल्या मनात यावेत तरी कशाला? आपण सद्गुरु चरणात लिन झालो आहोत, रममाण झालो आहोत, मग बाकीच्या इतर गोष्टी मालिक करून घेणार नाहीत का?
सद्गुरूंच्या ठिकाणी पूर्णत्वाने लीन झाल्यावर सद्गुरु आपोआप मार्ग दाखवतात. म्हणजे सर्वस्व कार्य सिद्ध होत असते. सद्गुरु म्हणजे पोरसातील वांगी नाहीत. अज्ञान अंध:कारातून पूर्ण प्रकाशात फेकणारे, प्रकाशाच्या अनुषंगाने वाटचाल करावयास लावणारे ते तेच सद्गुरु ! अशा तऱ्हेने सद्गुरु सर्वस्वांना वळणावर आणून सोडतात.
मानवाच्या मनाची बुद्धी चंचल झाली, सेवेकरी आडमार्गाने गेला, तर त्या सेवेकऱ्याला लाघव करून सन्मार्ग दाखवतात. मग हे सर्वस्व सद्गुरूंचे आहे की सेवेकऱ्याचे आहे? तर सद्गुरूंचेच सर्वस्व आहे. सद्गुरु हेच सर्वस्व आहेत. मी त्यांच्या चरणाचा शेवटच्या पायरीचा एक कण आहे, असे म्हटले तर बाकी काय उरते का?
सद्गुरु माझे आहेत, दरबार माझा आहे. हे सर्वस्व मालकांचे आहे. हे घर माझ्या समर्थांचे आहे, मालकांचे आहे. असे सेवेकऱ्याने म्हटले पाहिजे. समर्थ म्हणतात, “आज तुझ्या हातीच कारभार करून घ्यावयाचा आहे. मी अदृश्य आहे आणि दृश्याकडूनच हा कारभार करून घेत असतो. मी यातून वेगळा आहे. अशा त्या सत् पदाच्या ठिकाणी सेवेकरी रममाण झाल्यानंतर, आपला संसार कसा चालेल याची त्याला अडचण भासणार नाही. अशा तऱ्हेने सेवेकरी वागल्यानंतर सगुण-निर्गुण, आकारी-निराकारी, याचे सार कळते. असे कळल्यानंतर बाकी काय राहते का? (पुढे सुरु….२) ©️