दीपावली किंवा दिवाळी हा सण म्हणजे “अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे” प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.
दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. “दीप” म्हणजे “दिवा” आणि “आवली” म्हणजेच “ओळ“. याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी.
गोवत्सद्वादशी, वसुबारस – वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
धनतेरस किंवा धनत्रयोदशी – या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात.
धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात.
नरक चतुर्दशी – नरक चतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे.
लक्ष्मीपूजन – लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे.
बलिप्रतिपदा – हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात.
भाऊबीज – या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.
अशाप्रकारे दिवाळी किंवा दीपावली सर्वत्र साजरी होत असताना आपल्या आश्रमातही ती आपण साजरी करीत आहोत. त्या निमित्ताने आकर्षक असा आकाशकंदील लावण्यात आलेला असून, आश्रमात सगळीकडे प्रकाशाची उधळण केलेली आहे. अर्थात दिव्यांच्या या सणाला दिव्यांची आरास सजविण्यात आलेली आहे.क्षणचित्रे येथे समाविष्ट करण्यात आलेली आहेत – ©️