हे आसन तीन ताळ, सप्त पाताळ, एकवीस स्वर्ग सर्व ठिकाणी आहे. येथून सुटलेले आदेश कोठे जातात? कोठे घुमतात? याचा ज्याला अनुभव घ्यावयाचा असेल, त्याने आपल्या शक्तीने प्रयत्न करावा. कोणत्या कारणाने आपण या दरबारात आलो याचा प्रत्येकाने शोध लावावा.
आसनाधिस्त कोण आहेत? कोणत्या ठिकाणीं आहेत? कसे आहेत? याचा प्रत्येक सेवेकऱ्याने विचार करून शोध लावावा. क्षणभंगुर कर्तव्यासाठी ह्याचे महत्व आहे का? कशासाठी झगडवायाचे? नुसते सत्य, सत्य म्हणून घेता येत नाही. ते कृतीनेच घ्यावे लागते.
जो सत् आहे, ज्याचा मार्ग सत् आहे, तो त्या पदाला, प्रत्यक्ष आसनाला, प्रत्यक्ष मालकांना रोखू शकतो. प्रत्यक्ष स्थूल रुपात आसनाधिस्त असताना लाभ घेता येत नाही.
प्रकाश कोणी दिला? त्या प्रकाशाने काय शोधले? काय अनुभव घेतला तो सांगा. प्रकाश मिळविण्यासाठी पूर्वी ऋषी मुनीना किती कष्ट पडले, किती खडतर तप:श्चर्या करावी लागली? याचा प्रत्येकाने विचार करा.
सेवेकऱ्याना प्रकाश दिला तो कशासाठी दिला? आसनावरून जे अमूल्य बोल येतात, त्याची काय तऱ्हा आहे? याचा प्रत्यक्ष मनन पूर्वक विचार करा व अनुभव घ्या. आसन शोधण्यासाठी ओळख पटण्यासाठी तो फार मोठा असा अमूल्य ठेवा आहे आणि ते शोधण्याचे अधिकार दिले आहेत.
पूर्वी ऋषी मुनी सुद्धा तुमच्या सारखे मानवच होते. त्यांनी कोणता मार्ग चोखाळला याचा विचार करा. आमच्या मानवांमध्ये ती शक्ति नाही.
साध्य आणि साधन काय आहे, याचा शोध लावण्याची शक्ति मानवात आहे. या दरबारात साध्य काय आहे? याचा प्रत्येकाने शोध लावा. या दरबारचे अधिकार फार श्रेष्ठ दर्जाचे आहेत. कोणालाच त्यांचा अंत घेता येणार नाही. प्रत्यक्ष उदाहरण – मुळ माया ! तिची काय तऱ्हा झाली? ते ध्यानात ठेवून पूर्ण विचाराने वाटचाल करा.(समाप्त) ©️